मुख्य सामग्रीवर वगळा

कामगंध सापळ्याची कीड व्यवस्थापनातील भूमिका

 कामगंध सापळ्याची कीड व्यवस्थापनातील भूमिका

         शेतकरी बंधूंनो कीटक हे स्वजातीययांशी सुसंवाद साधण्यासाठी स्वतःच्या शरीरातून विशिष्ट गंध असलेल्या रसायनांचे मिश्रण बाहेर सोडतात ही रसायने त्यांच्यामध्ये विशिष्ट प्रतिक्रिया निर्माण करून संदेशवहनाचे कार्य करतात यांना इंग्रजीत फेरोमोन असे म्हणतात सध्या काही किटकांचे कृत्रिम रित्या तयार केलेले फेरोमोन विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहेत सर्वसाधारणपणे मादी पतंगाच्या वासा द्वारे (कामगंधा द्वारे ) नर पतंगांना आकर्षित करून सापळ्यात पकडून त्यांचा नाश करून म्हणजेच त्यांच्या मिलना मध्ये बाधा निर्माण करून पतंग वर्ग किडीचे व्यवस्थापन मिळण्यासाठी फेरोमन चा मोठ्या प्रमाणात कपाशी, तुर, हरभरा सोयाबीन यासारख्या पिकात वापर होत आहे. समागमासाठी कार्यक्षम सहचर शोधण्यासाठी काम गंधाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो याच्या गंधाने विरुद्धलिंगी कीटक परस्पराकडे मिलनासाठी आकर्षित होतात या तत्त्वाचा वापर प्रामुख्याने खालील तीन प्रकारे कीड व्यवस्थापनासाठी करता येतो 

(1) फेरोमोन सापळे वापरून किडींचे सर्वेक्षण करणे

 (2) मोठ्या प्रमाणात किडीचे पतंग सापळ्यात पकडून त्यांचा नाश करणे

 (3) कीटकांच्या मिलनात अडथळा निर्माण करून त्यांच्या पुनरुत्पत्ती ला अटकाव करणे.

   शेतकरी बंधूंनो किडींच्या सर्वेक्षणासाठी एक हेक्टर क्षेत्रात सर्वसाधारणपणे पाच कामगंध सापळे पुरेसे आहेत त्यांचा वापर सनियंत्रणाकरिता करता येतो सर्वसाधारणपणे पीक संरक्षण उपाय सुरू करण्यापूर्वी सापळ्यात कमीत कमी किती पतंग अडकले आहेत याची संख्या निश्चित केलेली असते उदाहरणार्थ सोयाबीन पिकात स्पोडोप्टेरा या किडीचे सरासरी 8 आठ ते 10 नर पतंग सतत दोन-तीन दिवस आढळून आल्यास या किडीच्या व्यवस्थापनासाठी उपाय त्वरित योजावे असा संकेत यातून घ्यावा. शेतकरी बंधुंनो सनीयंत्रणा व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात नर पतंगांना अडकवून किडींचे व्यवस्थापन मिळण्यासाठी सुद्धा कामगंध सापळ्यांचा वापर होऊ शकतो उदाहरणार्थ कपाशी पिकात गुलाबी बोंड अळीच्या नर पतंग मोठ्या प्रमाणात कामगंध सापळे द्वारे आकर्षित करून सापळ्यात अडकवून त्यांचा नाश करण्यासाठी व गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन मिळविण्यासाठी प्रती एकर आठ ते दहा कामगंध सापळे गुलाबी बोंड अळीच्या गोळी सह लावावे. कीटकाच्या मिलनात अडथळा निर्माण करण्यासाठी सापळ्यातून लिंग प्रलोभन रसायनाचा सूक्ष्म गंध वातावरणात पसरतो त्यामुळे मिलनासाठी सहचर शोधताना कीटकाची फसगत होते परिणामी त्यांचे मीलन न झाल्यामुळे प्रजोत्पादन होत नाही त्यामुळे पुढील पिढीतील कीटकाच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येते. हे कामगंध सापळे वापरताना पिकाच्या उंचीच्या वर साधारणपणे 1 ते1.5 फूट उंची ठेवून वापरावे तसेच या सापळ्यातील संबंधित पिकावरील संबंधित किडी करिता वापरली जाणारी काम गंध गोळी साधारणपणे 20 दिवसानंतर बदलावी. सध्या बाजारात तूर व हरभरा पिकावरील घाटेअळी, सोयाबीन वरील स्पोडोप्टेरा अळी, कपाशीवरील गुलाबी बोंड आळी बोंड आळी इत्यादीची कामगंध सापळे बाजारात उपलब्ध आहे अर्थात ह्या या सापळे विकणाऱ्या विविध कंपन्या त्यांचे दर पुरवठा पद्धत याबद्दल माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून माहिती घ्या व शास्त्रोक्त रित्या कामगंध सापळ्यांचा वापर योग्यवेळी योग्य पद्धतीने योग्य प्रमाणात करा. आवश्यकतेनुसार किंवा गरजेनुसार कामगंध सापळे वापरण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या. धन्यवाद 

टिप्पण्या