मुख्य सामग्रीवर वगळा

सुरु होता पावसाळा/ नियमीत खावा टाकळा//

 सुरु होता पावसाळा/

नियमीत खावा टाकळा// 


(टिप -  पावसाळा आला ही भाजी कुठंहि मीळते.

विदर्भात यास तरोटा म्हणतात.

टाकळा भाजी रस्त्याच्या कडेला शेतात बांधावर कुठंही मुबलक मीळते.

टाकळा भाजी खातांना लहाणांन्या फार कमी द्यावी मोठ्यांनीही कमीच खावी विरेचक असल्याने पोट जास्तच साफ होण्याचा त्रास होउ शकतो.ऐक दोन चमचे उत्तम) 


स्वानुभव - टाकळा बि टाकळा पाने चुर्ण बाळहिरडा नित्यसेवनाने शितपीत्ताचा त्रास कमी होतो.

मी लहान असतांना आमचे शेजारी कात्रे काकु असायच्या आमच घराचे मागील बाजुस राहायच्या काका आयसोलेशन नगर पालीका दवाखान्यात नवाथे नगर अमरावतीत सर्व्हीस करत .

माझे आईवडील होमीओपॕथी असल्याने व त्यावेळी होमीओपॕथीला कुणी विचारत नसे वडीलांनी संस्था काढली अन आईवर सर्व घराची जबाबदारी आली .आई अमरावती पासुन 15 की.मी.वडाळी येथे प्रॕक्टीसला जायची सकाळी तीथे व संध्याकाळी घरी दवाखाना असायचा. 

त्यामुळे आम्ही भांवड शेजारच्या सहवासात जास्त . अश्यात आमटीचा सुंगध आला की मी पळत कात्रे काकुंकडे जात अन भरभरुन जेवत असे .चपाती व कोकम गुळ टाकलेली आमटी म्हणजे अमृतच .

मी मराठा(कुणबी) अन काकु ब्राह्मण आमच्या घरात वडील व भाउ ,मटन अंडी खात मात्र मी शाकाहारी राहायचे कारण फक्त काकु .तीची आठवन येण्याचे कारणही तसच आहे ती पावसाळा आला की बाहेरच्या रानभाज्या आणून भाजी करत होती. त्यात टाकळा पावसाळ्यात आठवड्यातुन तीन वेळा खायची .

मला ती जरा कडवटलागायची पण जबरदस्तीने खाउ घालायची अन म्हनायची ही पावसाळाभर खाल्ली तर आपन निरोगी राहतो .मधुमेह त्वचाविकार होत नाही.आज प्रकर्षाने जानीव होते की खरंच सुंदर दिवस होते ते.जातीभेद न पाळता आईसारखे प्रेम देउन सर्व श्लोक पाठकरुन सात्त्विक आहार देणारी स्वतःचे दोन मुल ऐक मुलगी असतांनाही मला तेवढेच प्रेम देणारी माउली.त्यांना कधीही आजारी पडलेल मी बघीतल नाही.

मला पावसाळ्यात टाकळा उगवला की तीची आठवन होते .

व मी टाकळा आणून भाजी नियमीत खातो.त्यामुळे उतरत्या वयातही मधुमेह कींवा तत्सम आजार नाहीत .मला काकुंनी दिलेला आहार ,विहार ,पुजा पाठ वेदादि ज्ञान, शाकाहार ही तिची देण आहे आईसारखे प्रेम देणार्या ह्या माउलीला प्रणाम.

चला बघुया टाकळा उपयोग शास्त्रीय नाव - Cassia tora (कॅसिया टोरा) 

कूळ - Caesalpinaceae (सिसालपिनेसी) 


टाकळा ही वर्षायू वनस्पती ‘‘सिसाल-पिनेसी’’ म्हणजेच आपट्याच्या कुळातील आहे. टाकळा ही रोपवर्गीय वनस्पती एक ते दोन फुटांपर्यंत उंच वाढते. या वनस्पतीला काही भागांत ‘तरोटा’ किंवा ‘तरवटा’ अशी स्थानिक नावे आहेत. टाकळा हे तण पडीक ओसाड जमिनीवर, शेतीत, बागांमध्ये, जंगलात, रस्त्यांच्या कडेने सर्वत्र वाढलेले असते. टाकळ्याच्या बिया भाजल्यानंतर कॉफीसारखा वास येतो. म्हणून काॕफीत भेसळ होते.

- खोड व फांद्या - गोलाकार. खोडाच्या तळापासून अनेक फांद्या तयार होतात. 

- पाने - संयुक्त प्रकारची, एकाआड एक, ७.५ ते १० सें. मी. लांब. पर्णिका ६, त्यांच्या उपजोड्या. खालच्या दोन पर्णिकांच्या जोड्यांमध्ये प्रत्येक एक शंखाकृती ग्रंथी. पर्णिकेची सर्वांत खालची जोडी लहान, तर वरच्या जोडीतील पर्णिका आकाराने मोठ्या. पर्णिका रात्री मिटतात. पर्णिका लांबट-गोल किंवा अंडाकृती-आयताकृती, तळ तिरपा. 

- फुले - पिवळसर रंगाची, थोडीशी अनियमित, द्विलिंगी, पानांच्या बेचक्यात जोडीने येतात. पाकळ्या पाच, वरची पाकळी आकाराने थोडी मोठी, द्विखंडित. पुंकेसर सात, असमान लांबीचे. बीजांडकोश एक कप्पी. 

- शेंगा - १० ते १६ सें.मी. लांब, कोवळ्या असताना वक्र, बिया २५ ते ४० तपकिरी - काळसर किंवा करड्या रंगाच्या, त्यांचे टोक आडवे कापल्यासारखे, कठीण कवचाच्या. 

-ही वनस्पती पावसाळ्यात उगवते व ऑक्टोवर ते डिसेंबर या कालावधीत तिला फुले येतात. 

टाकळा ही वनस्पतीला उग्र वास किंवा दुर्गंधी असली तरी टाकळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. औषधात पंचांग वापरतात. 


टाकळा 

( सं . - चक्रमर्दक , दद्रुघ्न . हिं . - हाकुच ) यास देशावर तरवटा असे म्हणतात . रानभाजीत टाकळा जगप्रसिद्ध आहे . 

पर्जन्य पडून पंधरा दिवस होतांच टाकळा भाजी करण्यास उपयोगी असा होतो . हे झाड सुमारे कंबरेइतके वाढते . यास पिवळ्या रंगाची फुले येऊन बारीक शेंगा येतात . या शेंगांत मेथ्यांप्रमाणे बिया असतात . 

गरिब लोक टाकळ्याच्या भाजीवरच कित्येक दिवस काढतात . 

टाकळा - गोड , रुक्ष , लघु , कडू , तिखट , हृद्य , शीतळ , खारट ; व वायु पित्त , कफ , दद्रु , कुष्ट , कृमि , दमा , मस्तकशूल , व्रण , मेदोरोग , परमा , त्रिदोष ,पित्तकर , अरुचि , ज्वर , मल व मूत्र यांचा स्तंभ , मेह(मधुमेह प्रमेह) व खोकला यास उपयुक्त आहे.

याचे बीज - ग्राहक , उष्ण , तिखट ; व कफ , कुष्ट , दमा , खोकला , दद्रु , कडू , विष , सूज , गुल्म व वातरक्त य यांचा नाश करितो . 

याच्या पाल्याची भाजी - लघु , आंबट , उष्ण ; व कफ , वायु , दद्रु , कुष्ट , परमा , कंडू , खोकला , दमा यांचा नाश करितो . 

( १ ) इसबावर- टाकळ्याची मुळी उगाळून लावावी . 

( २ ) काळ पुळीस - पांढऱ्या टाकळ्याचा पाला ७ दिवस लावावा . 

( ३ ) गजकर्णावर टाकळ्याच्या पाल्याचा रस निंबाच्या रसांत मिश्र करून लावावा . 

( ४ ) सोमरोग म्हणजे जलप्रदरावर- टाकळ्याच्या मुळ्या तांदुळाच्या धुवणांत वांटून प्राशन कराव्या . 

( ५ ) पुष्टतेस व अंगांत गर्मी मुरून रक्त नासते त्यावर टाकळ्याची मुळे आणून स्वच्छ धुवून सुकवावी , व त्यांची वस्त्रगाळ पूड करून ठेवावी . प्रतिदिवशीं प्रातःकाळी तूप २ तोळे , खडीसाखरेची पूड १ तोळा , यांत टाकळ्याच्या मुळाचे चूर्ण ४ माशांपासून १ तोळ्यापर्यंत कालवून प्यावे . याच्या योगाने रक्त शुद्ध होऊन शक्तिही वाढते . 

( ६ ) अर्धशिशीवर - टाकळ्याचें बीं कांजीत वांटून लेप करावा . 

( ७ ) इसबास - टाकळ्याच्या बिया ६ भाग , बांवच्या ९ भाग , व गाजराचे बी २ भाग , यांचे चूर्ण मडक्यांत घालून गोमूत्रांत ८ दिवस भिजू द्यावे व नंतर लावावे . हे औषध सुकू न दिले तर वर्षभर उपयोगी पडते . 

( ८ ) वसामेहावर - टाकळ्याच्या मुळांचा काढा द्यावा . 

( ९ ) वळ फुटण्यास टाकळ्याचा पाला बारीक वाटून त्याची गोळी करून वळावर बसवावी . याप्रमाणे एकेक प्रहराने ताजी गोळी बसवावी . म्हणजे वळ फुटतो . 

( १० ) वासरांस किंवा गुरांस कृमि झाले असता त्यावर- टाकळ्याच्या पाल्याचा रस काढून त्यात तितकेंच ताक घालावे , आणि गंधक एक तोळा व हिंग पाव तोळापर्यंत दोन्हींची पूड करून त्यांत मिश्र करून पाजावी . वासरांस देणे झाल्यास रस नवटांक व औषधे चतुर्थांश असावी . थोर गुरांस अच्छेरपासून एक शेरपर्यंत रस व वर लिहिल्या प्रमाणे वजनाने औषधे असावी . 

( ११ ) शीतपित्तावर - टाकळ्याच्या फळांचे चूर्ण तुपांत कालवून द्यावे . 


संदर्भ -वनौषधी गुणादर्श

- टाकळ्याच्या पानांत विरेचन द्रव्य व लाल रंग असतो. या वनस्पतीत ‘एमोडीन’ ग्लुकोसाइड आहे. टाकळा आनुलोमिक असून, याची क्रिया त्वचेवर होते. टाकळा सर्व प्रकारच्या त्वचारोगांत देतात. त्वचा जड झालेली असल्यास याचा विशेष उपयोग होतो. त्वचारोगात पानांची भाजी देतात व बिया वाटून लोप करतात. बिया लिंबाच्या रसातून वापरण्याचा प्रघात आहे. 

- मुळे उगाळून लिंबाच्या रसात बनविलेली पिष्टी गजकर्णासाठी वापरतात. पाने व बियांमध्ये ‘क्रायझोजेनिक आम्ल’ असून, ते त्वचारोगात मौल्यवान आहे. 

- पाने कृमिघ्न आणि सौम्य विरेचक आहेत. 

- पानांचा काढा दातांच्या वेळी मुलांना येणाऱ्या तापावर निर्देशित करतात. 

- पित्त, हृदयविकार, श्‍वास, खोकला यात पानांचा रस मधातून देतात. 


टाकळ्याची भाजी - 


टाकळ्याच्या पानांची भाजी गुणाने उष्ण असल्याने शरीरातील वात व कफदोष कमी होण्यास मदत होते. वरचेवर ही भाजी खाल्ल्याने अंगातील अतिरिक्त मेद झडण्यास याचा उपयोग होतो. त्याचबरोबर इसब, ॲलर्जी, खरूज यासारखे त्वचाविकारही कमी होतात. लहान मुलांच्या पोटातील कृमी बाहेर पडण्यासही या भाजीचा उपयोग होतो. टाकळ्याची भाजी पचायला हलकी, तिखट, तुरट, पित्तकर आहे व मलसारक आहे. 


पाककृती - 


कृती १ 


- फुले येण्यापूर्वीची कोवळी पाने भाजीसाठी वापरावीत. 

साहित्य - कोवळी पाने, कांदा, ओली मिरची, तेल, आले, मीठ, ओले खोबरे, हळद, गूळ इ. 

कृती - पाने स्वच्छ धुऊन, पाणी गळून जाऊ द्यावे. कढईत तेल टाकून कांदा परतून घ्यावा, मग त्यात ओली मिरची व हळद टाकावी. नंतर त्यावर बारीक चिरलेली भाजी टाकून ती वाफेवर शिजू द्यावी. भाजी शिजत आली, की त्यात थोडा गूळ आणि मीठ घालावे. त्यावर ओले खोबरे घालावे. या भाजीत भिजवलेली तूरडाळ किंवा फणसाच्या आठळ्यांचे बारीक तुकडे ती शिजत असताना टाकल्यास भाजी अधिकच चवदार बनते. 


कृती २ 


साहित्य - दीड वाटी टाकळा पाला (कोवळा पाला देठे काढून चिरावा), अर्धी वाटी चिरलेला कांदा, ५ ते ६ ठेचलेल्या लसणीच्या पाकळ्या, मीठ, तिखट, तेल, मोहरी, हिंग, हळद, गूळ इ. 

कृती - जरा जास्त तेलावर कांदा, लसूण परतावे, त्यावर चिरलेली भाजी घालून झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी. गरज वाटल्यास पाण्याचा हबका मारावा. तिखट, मीठ, गूळ घालून शिजवून घ्यावे. 


कृती ३ 


टाकळ्याचे रायते - 

साहित्य - एक वाटी टाकळ्याची पाने, चिंचेचा कोळ व गूळ, हिरवी मिरची, मोहरी पूड, पाणी, मीठ इ. 

कृती - पाने व मिरच्या सोबत वाटावे. त्यात गूळ, चिंचेचा कोळ, मीठ घालावे. मोहरी पूड पाण्यात फेसून घालावी. 


कृती ४ 


टाकळ्याची तंबळी 

साहित्य- एक वाटी टाकळ्याची पाने, एक वाटी ओले खोबरे, हिरव्या मिरच्या, दीड वाटी ताक, चिंच, मिरे, जिरे, तूप, मीठ इ. 

कृती - कढईत तुपावर मिरची व पाने परतावीत. त्यात मिरे, जिरे घालून दोन मिनिटे परतावे. मग अन्य साहित्य मिक्सरमध्ये घालून वाटावे आणि नंतर ताकात मिसळावे. पोटाच्या विकारासाठी तंबळी उपयुक्त आहे.

टिप्पण्या